गेल्या काही दिवसांमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. अनेकांना डान्स करताना, व्यायाम करताना, खेळताना हृदयविकाराचा धक्का बसत आहे. तरुणांमध्येही हृदयविकाराच्या धक्क्याचे प्रमाण लक्षणीय आहे. यादरम्यान, हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विद्यार्थ्याचा वाढदिवसादिवशीच कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याचं वय केवळ १६ वर्षे एवढंच होतं. १९ मे रोजी हृदयविकाराचा धक्का आल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. दु:खद बाब म्हणजे ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी त्याचा जन्मदिन होता. तसेच घरातही आनंदाचं वातावरण होतं. शोकाकुल आई वडिलांनी त्यानंतर केक कापून मुलाच्या पार्थिवाजवळ ठेवला. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
येथील बाबापूर गावातील दहावीतील विद्यार्थी असलेला सचिन १८ मे रोजी आपल्या जन्मदिनासाठी आसिफाबाद शहरामध्ये खरेदीसाठी गेला होता. बाजारात असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि तो तिथेच कोसळून पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र परिस्थिती खूपच बिघडल्याने त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान, त्याचा मृत्यू झाला.
सचिनच्या पार्थिवाला गावात त्याच्या घरी आणण्यात आले. कुटुंबीयांनी या दु:खद वातावरणातही त्याच्या पार्थिवाजवळ केक कापला. यादरम्यान, त्याच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. त्यांनी तो केक मुलाच्या पार्थिवाजवळ ठेवला आणि मृतदेहाला मिठी मारून रडू लागले. हे दृश्य पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
केक कापल्यानंतर मुलांनी सचिनसाठी जन्मगीत गायले. तर स्थानिक ग्रामस्थांनी त्याच्या आठवणीमध्ये मेणबत्त्या पेटवल्या. सचिन त्याच्या वाढदिवसासाठी उत्सुक होता. तसेच यावेळी वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याची त्याची इच्छा होती. मात्र त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली. आनंदाच्या दिवशीच त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सचिनच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण गाव जमला होता.