शिलाँग : १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी लैंगिक संबंध ठेवण्याबाबत विवेकपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम आहे, असे सांगत मेघालय उच्च न्यायालयाने एका तरुणाविरुद्ध पॉक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२) अंतर्गत दाखल प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) रद्द केला.
किशोरवयीन मुलीचा शारीरिक व मानसिक विकास पाहता हे न्यायालय असे मानते की, अशी व्यक्ती संभोगाच्या प्रत्यक्ष कृतीबाबत विवेकपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम आहे. न्यायालय फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम ४८२ अंतर्गत दाखल याचिकेवर सुनावणी करत होते. यात याचिकाकर्त्यावर पॉक्सोच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
नेमके काय झाले?याचिकाकर्ता विविध घरांत काम करत होता. यादरम्यान त्याची या मुलीशी ओळख झाली. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर एक दिवस दोघांनी नातेवाइकांच्या घरी सोबत रात्र घालवली. मुलीच्या आईला ही बाब समजल्यानंतर तिने याचिकाकर्त्याविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केला. हा एफआयआर रद्द करण्यासाठी याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीअंती याचिकाकर्त्याविरुद्धची कार्यवाही रद्द करून न्यायालयाने म्हटले की, प्रथमदृष्ट्या असे दिसते की, यात कोणताही गुन्हा घडला असल्याचे दिसत नाही.