नवी दिल्ली- पगार मागितला म्हणून घरकाम करणाऱ्या 16 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापेक्षा विकृत म्हणजे हत्येनंतर मुलीच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. तीन वर्षाआधी या मुलीला झारखंडहून दिल्लीला आणलं होतं. तिला पुन्हा झारखंडला परतायचं होतं म्हणूनच तिने पगार मागितला. म्हणून चिडलेल्या व्यक्तीने तिची बंद खोलीत तव्याने मारहाण करुन हत्या केली. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले व ते बॅगेत भरून बॅग नाल्यात फेकली. मुलीच्या हत्येत एकुण चार जणांचा समावेश असून एका व्यक्तीला पोलिसांची अटक केली आहे. इतर तीन जण फरार आहेत.
4 मे रोजी मियावाली नगर इथल्या नाल्यात मुलीचा मृतदेह आढळल्याने ही घटना समोर आली. तब्बल 16 दिवसाच्या तपासानंतर पोलिसांनी हे प्रकरण सोडवलं. मुलीची ओळख पटली असून पोलिसांनी 30 वर्षीय मंजीत करकेटाला अटक केली आहे. हा आरोपी रांचीचा रहिवासी आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलगी रांची जवळच्या माल्गोची राहणारी होती. घरी आई व दोन मोठे भाऊ असं तिचं कुटुंब आहे. घरामध्ये पैशांची अतिशय चणचण होती. म्हणून या मुलीला तीन वर्षाआधी राकेश नावाच्या व्यक्तीन नोकरीसाठी दिल्लीला आणलं. रांचीचा राहणार मंजीत करकेटा घरकाम करणाऱ्या महिला देण्याचं काम करतो. मंजीतबरोबर शाहू आणि गौरी हे दोघेही काम करतात. पीडित मुलीला आरोपी विविध जागी काम करायला पाठवायचे. महिन्याला 6500 रुपये पगात तिला ठरवला होता पण त्यांनी तिला एक पैसाही दिला नाही. मुलीने परत झारखंडला पाठविण्याची विनंती त्यांना केली पण त्या आरोपींनी ती धुडकावून लावली. मे महिन्याच्या सुरूवातीला एक दिवशी पीडित मुलीने राकेशकडे घरी पाठविण्यासाठी हट्ट केला. तीन वर्षांचा पगारही मागितला. त्यावेळी राकेशने तिला शाहू आणि मंजीतच्या ताब्यात दिलं. शाहू व मंजीतने तिला नांगलोईच्या भूतवाली गल्लीमधील एका इमारतीमधील चौथ्या मजल्यावर नेलं. तेथे तव्याने तिच्या डोक्यावर वार करत तिची हत्या केली व नंतर मृतदेहाचे तीन तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे बॅगमध्ये भरून मियावली नगरमधील ज्वालापुरी जवळच्या नाल्यात फेकले.
दरम्यान, 4 मे रोजी नाल्यात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन घटनेचा शोध लावला.