नवी दिल्ली : भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आता १६२ प्रशिक्षित श्वानांची तुकडी तयार करीत आहे. अशाप्रकारे बचाव कार्यासाठी प्रशिक्षित श्वान पथक तयार केले जाण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि चेन्नईत आलेला पूर आणि गेल्या वर्षी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर बचाव कार्यात सामील असलेल्या एनडीआरएफने श्वान तुकडी तयार करण्याच्या कामाला ‘मिशन मोड’वर प्रारंभ केला आहे. एनडीआरएफ आपल्या अर्बन सर्च अॅण्ड रेस्क्यू (युएसएआर) कार्यासाठी अश १६२ श्वानांना प्रशिक्षण देत आहे. ‘सामान्यपणे पोलीस दलात असलेल्या आणि ट्रॅकर श्वानांपेक्षा हे श्वान जरा वेगळे आहे. हे श्वान मलबा हुंगून लगेच त्याखाली कुणी दबलेला आहे की नाही, हे सूचित करतात. एनडीआरएफने या विशेष प्रकारच्या श्वानांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी घेतली आहे,’ असे एनडीआरएफचे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)मलब्याखाली दबलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची क्षमता असलेल्या या श्वानांमध्ये लॅब्रेडोर आणि जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानांचा समावेश आहे. मलब्याखाली दबलेल्यांचा शोध घेण्याची क्षमता बचाव कार्यात सामील असलेल्या माणसांपेक्षा श्वानांमध्ये अधिक प्रमाणात असते, असे आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच आम्ही हे श्वान पथक तयार करण्याचे ठरविले आहे, असे सिंग म्हणाले.
बचाव कार्यासाठी १६० श्वान
By admin | Published: February 08, 2016 3:50 AM