ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - 'नीरजा' या चित्रपटामुळे नीरजा भानोत या भारतीय हवाई सुंदरीची विस्मृतीत गेलेली शौर्य कथा आज नव्या पिढीपर्यंत पोहोचली आहे. १९८६ साली पॅलेस्टाईनच्या अबू निदाल दहशतवादी संघटनेने पॅन एएम फ्लाईट ७३ चे कराची येथून अपहरण केले होते.
या विमानाच्या अपहरणकर्त्यांपैकी एकाला अमेरिकेच्या एफबीआयने २००१ साली बँकॉक येथून अटक केली होती. झायद हसन अब्द अल लतीफ मसूद अल सफारीनी असे या अतिरेक्याचे नाव होते. अपहरणाचा उद्देश सफल होत नसल्याचे लक्षात येताच त्याने नीरजा आणि विमानातील अन्य प्रवाशांवर गोळया झाडल्या होत्या.
एफबीआयने २००१ मध्ये त्याला बँकॉकमधून अटक केल्यानंतर अमेरिकेत खटला चालला. झायद हसनला अमेरिकन न्यायालयाने १६० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून, तो कोलोरॅडो येथील तुरुंगात आहे.
या अपहरणातील अन्य चार दहशतवादी २००८ मध्ये पाकिस्तानातील अदायला तुरुंगातून फरार झाले. जानेवारी २०१० मध्ये या फरार अतिरेक्यांपैकी एकाचा उत्तर वझरिस्तानात ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला. मात्र या अतिरेक्याच्या मृत्यूची ठोस माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे अजूनही एफबीआयच्या मोस्ट वॉंटेड अतिरेक्यांमध्ये त्यांचा समावेश असून, त्यांच्यावर पन्नास लाख डॉलरचे इनाम अमेरिकेने ठेवले आहे.
पाच सप्टेंबर १९८६ रोजी या अतिरेक्यांनी कराची येथून अमेरिकेच्या पॅन एएम फ्लाईटचे अपहरण केले होते. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नीरजाने अतिरेक्यांचा सामना करताना जे शौर्य, धाडस दाखवले त्याला तोड नाही. विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवताना नीरजाने स्वत:च्या प्राणांची पर्वा केली नाही. अशोक चक्र या शौर्य पुरस्काराने सन्मानित होणारी नीरजा भानोत ही सर्वात तरुण भारतीय आहे.
अबू निदाल ही पॅलिस्टाईन दहशतवादी संघटना होती. यासेर अराफात यांच्याशी मतभेद झाल्यानंतर १९७४ साली अबू निदालने त्याच्या नावाने या दहशतवादी संघटनेची स्थापन केली. एएनओने वीस देशांमध्ये दहशतवादी हल्ले केले. अमेरिका, इस्त्रायल, ब्रिटन, फ्रान्स या देशांना ही संघटना आपली शत्रू मानत होती. कुठल्याही परिस्थितीत इस्त्रायलबरोबर तडजोड न करण्याची या संघटनेची भूमिका होती.