ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6- ट्रेनच्या 12 तासांच्या प्रवासात तुम्हाला फ्रेश होण्यासाठी अथवा नैसर्गिक विधी करण्यासाठी टॉयलेट नसल्यास काय होईल. तुम्हाला थोडंसं विचित्र वाटेल. मात्र 60 हजार ट्रेनचे इंजिन जवळपास 163 वर्षांपासून टॉयलेटविरहित आहेत. ट्रेनच्या चालकांनी टॉयलेटची मागणी करूनही त्यांना टॉयलेट देण्यात आले नव्हते. त्यावेळी चालकाला ट्रेन सुरू असताना टॉयलेटला जाण्याचा अधिकार देणं शक्य नसल्याची सबब रेल्वे प्रशासनानं पुढे केली होती.
मात्र ट्रेन चालकांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश आलं आहे. रेल्वे प्रशासनानं पहिल्यांदाच ट्रेनच्या इंजिनमध्ये बायो-टॉयलेट बसवलं आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते झेंडा दाखवून या ट्रेनच्या इंजिनची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, इंजिनमध्ये बसवलेल्या बायो-टॉयलेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. ट्रेनचा स्पीड शून्यावर असतानाच या टॉयलेटचा दरवाजा उघडणार आहे. ट्रेन सुरू असताना ट्रेन चालकांना या टॉयलेटचा वापर करता येणार नाही. ट्रेन चालक ट्रेनमध्ये असताना इंजिनमधली कोणतीही गोष्ट कार्यान्वित होणार नाही, अशी यंत्रणा या टॉयलेटमध्ये बसवण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो ट्रेनमध्येही चालकाला प्रत्येक तीन तासांनंतर 40 मिनिटांचा ब्रेक मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
रेल्वेच्या पुरुष चालक संघटने (आयआरएलआरओ)नं याविरोधात केंद्रीय मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली होती. त्यावेळी रेल्वे प्रशासन ट्रेन चालकांसोबत निर्दयीपणे वागत असल्याचं केंद्रीय मानवी हक्क आयोगाला सांगितलं होतं. ब-याचदा लघुशंका न केल्यानं अपघात होत असल्याचीही बाब या संघटनेचं मांडली होती. त्यामुळे अखेर आयआरएलआरओच्या लढ्याला यश येऊन इंजिनमध्ये बायो-टॉयलेट बसवण्यात आली आहेत.