१६४४ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM
नामांकित महाविद्यालयाचे प्रवेश फुल्ल : द्विलक्षीच्या प्रवेशाचा अंतिम दिवस
नामांकित महाविद्यालयाचे प्रवेश फुल्ल : द्विलक्षीच्या प्रवेशाचा अंतिम दिवसनागपूर : द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा शनिवार, ११ जुलै अंतिम दिवस आहे. अद्यापपर्यंत ३,७६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध महाविद्यालयात झाले आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयाचे प्रवेश हाऊसफुल्ल झाले असून, प्रवेशाच्या अंतिम दिनी १,६४४ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ३ जुलैपासून प्रवेश फेरीला सुरुवात झाली. द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या ५४०५ जागांसाठी ५९५७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. १ जुलैला द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली. ३ जुलैपासून द्विलक्षीच्या प्रवेशफेरीस सुरुवात झाली. प्रत्येक दिवशी किमान ७०० विद्यार्थ्यांचे प्रवेश देण्यात आले. यावषीर्ही द्विलक्षी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बरीच गर्दी केली होती. पहिल्याच तीन दिवसात शहरातील नामवंत महाविद्यालयातील प्रवेश फुल झालेत. आजपर्यत ३७६१ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतले आहे. शेवटल्या दिवशी १६४४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता प्रवेश प्रक्रिया पार पडल्यावर उर्वरित प्रवेशासाठी गुणवत्ता यादी लावण्यात येईल. यातून महाविद्यालयांचे अलॉटमेंट केल्या जाईल. यानंतर द्विलक्षी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या तसेच विज्ञान शाखेच्या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांचे नाव काढण्यात येणार आहे. १५ जुलैला विज्ञान शाखेच्या प्रवेशाची यादी प्रकाशित होण्याची शक्यता आहे.