नवी दिल्ली : सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह देशातील १७ राज्यांमध्ये धुक्याची चादर पसरली होती. दिल्लीत सोमवार मोसमातील सर्वांत थंड दिवस ठरला असून, किमान तापमान ३.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
धुक्यामुळे दिल्लीत तब्बल १७८ हून अधिक उड्डाणांना उशीर झाला आणि ८४ उड्डाणे रद्द करण्यात आली. १० विमानांचे मार्ग बदलून जयपूर, गोव्याकडे वळवण्यात आले.
दिल्लीकडे येणाऱ्या १८ गाड्या उशिराने धावत होत्या. उत्तर प्रदेशातील ३२ जिल्ह्यांमध्ये धुके पसरले असून, २५ जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आहे. मेरठमध्ये किमान तापमान २.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बिहारमध्येही ३८ जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट १६ जानेवारीपर्यंत राहणार आहे.
एअर इंडियाचे दिल्ली-मुंबई विमान अचानक रद्दछत्रपती संभाजीनगर : एअर इंडियाचे सकाळच्या वेळेतील दिल्ली आणि मुंबईचे विमान सोमवारी अचानक रद्द झाले. अचानक विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे नियोजनच विस्कळीत झाले. दिल्लीतील खराब वातावरणामुळे विमान रद्द झाल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.