अहमदाबाद : गुजरात पोलिसांनी काल रात्री एका व्यापक मोहिमेंतर्गत राज्यातील १७ तुरुंगांत एकाच वेळी छापे मारून अनेक मोबाइल फोन व प्राणघातक वस्तूंसह अमली पदार्थ जप्त केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.तुरुंगात काही बेकायदेशीर कृत्ये तर सुरू नाहीत ना हे शोधण्यासह कैद्यांना कायद्यानुसार सुविधा मिळतात की नाही हे जाणून घेणे हा या मोहिमेचा उद्देश होता.
गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्या अध्यक्षतेखाली गांधीनगर पोलिस भवनातील पोलिस महासंचालक (डीजीपी) कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये छापे मारण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट आणि इतर शहरांतील मध्यवर्ती कारागृह तसेच उप कारागृहात छापे मारण्यात आले. या कारवाईत १७०० पोलिसांचा सहभाग होता. त्यापैकी अनेकांनी तुरुंगातील घडामोडींची माहिती टिपण्यासाठी शरीरावर कॅमेरे लावलेले होते.
शोधक श्वानाचाही सहभाग‘या छाप्यांत १६ मोबाइल फोन, १० इलेक्ट्रॉनिक वस्तू, ३९ घातक वस्तू, तीन अमली पदार्थ आणि ५१९ तंबाखू उत्पादने जप्त करण्यात आली, असे सरकारने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या कारवाईत श्वानपथकाचाही समावेश होता.