सुरत : सूर्यनगरी एक्स्प्रेसने मुंबईहून सुरतला येणाऱ्या एका प्रवाशाकडून रेल्वे पोलिसांनी तब्बल १७ किलो सोने हस्तगत केले असून, त्याची किंमत सुमारे ५ कोटी १0 लाख रुपये इतकी आहे. ज्या प्रवाशाकडे हे सोने सापडले, तो कुरियर कंपनीचा कर्मचारी असून, आपल्याला बॅगेत काय आहे, याची कल्पना नव्हती, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.हा प्रवासी अहमदाबादकडे जाणा-या सूर्यनगरी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होता. तो सुरतला उतरणार होता. मनिष बनवारीलाल असे या प्रवाशाचे नाव आहे. तिकीट तपासनिसाच्या दक्षतेमुळे हे सोने पकडले गेले. तपासनिसानेच त्याला आधी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. गाडी सुरतला थांबल्यानंतर तेथील पोलिसांनी त्याला अटक केली. तो मुंबईतील एअर पार्सल कुरियर कंपनीचा कर्मचारी आहे. हा प्रवासी बोरिवली स्थानकावर गाडीत शिरला. तिकीट तपासनीसाला त्याच्या हालचालींचा संशय आला. त्याने लगेचच ही बाब रेल्वे पोलिसांना कळवली.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या बॅगेची झडती घेतली, तेव्हा त्यात १७ किलो सोने सापडले. आपणास ही बॅग सुरतला पोहोचवण्यास सांगण्यात आले होते आणि त्या बदल्यात मला बक्षीस मिळणार होेते, असे मनिषने पोलिसांना सांगितले.
कोणाकडे सोपवायचे होते?या बॅगेत सोने होते, हे माहीतच नसल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे हे सोने सुरतला पाठवणारा कोण होता आणि ते कोणाला देण्यात येणार होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.