हिसार/नवी दिल्ली : माजी उपपंतप्रधान देवीलाल चौधरी यांच्या जयंतीनिमित्त फतेहाबादमध्ये रविवारी सन्मान दिवस रॅली झाली. यासाठी लोकदलाचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह १७ नेत्यांना निमंत्रण दिले होते. मात्र, व्यासपीठावर केवळ पाच मोठे नेते दिसून आले.
या नेत्यांमध्ये नितीशकुमार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राजदचे नेते तेजस्वी यादव, अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल व माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची उपस्थिती होती. शिवसेनेकडून अरविंद सावंत उपस्थित होते. त्यामुळे भाजपविरोधात देशपातळीवर एकत्र यावेत यासाठी पुन्हा केलेले प्रयत्न तोकडे पडल्याचे दिसून येत आहे.
नितीशकुमार, लालूप्रसाद यांची सोनिया गांधींशी भेट
- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी रविवारी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. २०२४मध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
- सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ निवासस्थानी झालेली ही बैठक विरोधकांची एकजूट करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
- बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लालूप्रसाद यादव म्हणाले की, काँग्रेस पक्ष नवीन अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत आहे आणि या निवडणुकीनंतर पुन्हा भेटू, असे सोनिया गांधी यांनी सांगितले आहे.
काँग्रेस, डाव्यांशिवाय आघाडी शक्य नाहीसर्व बिगरभाजप पक्ष एकत्र आले तर देशाला उद्ध्वस्त करण्याचे काम करणाऱ्यांपासून ते मुक्ती मिळवू शकतात. भाजप समाजात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करीत आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांशिवाय विरोधी आघाडीची कल्पना केली जाऊ शकत नाही. नितीशकुमार, मुख्यमंत्री बिहार
सर्वांनी एकत्र काम करण्याची वेळ२०२४ मध्ये केंद्रातील सरकार बदलण्यासाठी प्रत्येकाने काम करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी निदर्शने केली; पण शेतकरी नेत्यांवरील खटले मागे घेण्याचे आश्वासन केंद्राने दिले होते; पण अद्याप ते पूर्ण केले नाही.शरद पवार,अध्यक्ष, राष्ट्रवादी
लोकशाही वाचविण्यासाठी एनडीए सोडलीजनता दल युनायटेड, शिरोमणी अकाली दल आणि शिवसेनेने संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची साथ सोडली.तेजस्वी यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री