नवी दिल्ली: देशातील सर्व राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली असताना, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देशातील 17 पक्ष निवडणूक आयोगाची भेट घेऊन पुढील निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर केला जावा, अशी मागणी करणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची भेट घेतली. त्यामध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीदेखील या मुद्यावर भर दिला होता. पुढील निवडणुकीत मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर करण्यात यावा अशी मागणी समाजवादी पक्ष निवडणूक आयोगाकडे करेल, असं त्यावेळी रामगोपाल यादव म्हणाले होते. निवडणूक आयोगानं मागणी मान्य न केल्यास पक्ष धरणं आंदोलन करेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. निवडणूक आयोगावर दबाव आणण्यासाठी इतर पक्षांची मदत घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं यादव म्हणाले होते. पुढील निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर व्हावा यासाठी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय वायएसआर काँग्रेस, डीएमके, जेडीएस, टीडीपी यांच्यासह डाव्या पक्षांनीही अनेकदा मतपत्रिकेचा आग्रह धरला आहे. विशेष म्हणजे भाजपाचा मित्र असलेल्या आणि राज्यात सत्तेत राहूनही वारंवार भाजपावर शरसंधान साधणाऱ्या शिवसेनेनंही मतपत्रिकेची मागणी केली आहे.
पुढील निवडणुकीत ईव्हीएम 'आऊट', बॅलट पेपर 'इन'? 17 पक्ष मतपत्रिकेसाठी आग्रही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 8:03 PM