जम्मू-काश्मीरचा समृद्ध धार्मिक वारसा जतन करण्यासाठी सरकारने काश्मीरमधील जवळपास सर्वच मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात 17 मंदिरे आणि धार्मिक स्थळांच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असून, यासाठी 17 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या धार्मिक स्थळांमध्ये काही ठिकाणे अशीही आहेत ज्यांना तीर्थ नव्हे तर तीर्थराज म्हटले जाते. यांच्यासोबत काश्मिरी पंडितांची मुळे जोडली गेलेली आहेत. जम्मू आणि काश्मीर सरकारचा पुरातत्व विभाग संबंधित जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली या मंदिरांचा आणि तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करून घेईल. या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर सरकारने एकूण 71 धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे, ज्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. यासाठी अंदाजे 420 कोटी रुपये एवढा खर्च येणार असून हा खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या मंदिरांचा होणार जीर्णोद्धार - पहिल्या टप्प्यात ज्या मंदिरांचा आणि धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार केला जाणार त्यांत, "पहलगामचे प्राचीन ममलेश्वर मंदिर आणि गौरी शंकर मंदिर, अनंतनाग जिल्ह्यातील अकिंगम येथील ऐतिहासिक शिव भगवती मंदिर, सालिया येथील पापरण नाग मंदिर, खीरम येथील माता रागन्या भगवती मंदीर, अनंतनाग येथील लोगरीपोरा, अश्मुकाम येथील खीर भवानी मंदिर, सालिया येथील करकुट नाग मंदिर. पुलवामतील गुफकराल त्राल, द्रंगबल पंपोर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर, जे वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी महत्त्वाचे आहे. याशिवाय इतरही अनेक छोटी मंदिरे आहेत ज्यांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे.
याशिवाय, लारकीपोरा येथील 'तीर्थराज', लोकभवन मंदिर कश्मिरातील अशांततेदरम्यान पूर्ण पणे नष्ट झाले होते. याच्यासाठी 3.21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काश्मिरी पंडितांसाठी हे ठिकाण अत्यंत महत्वाचे मानले जाते.
यासंदर्भात बोलताना ऑल जेके मायग्रंट (काश्मीर युनिट) पंडित असोसिएशनचे अध्यक्ष संजय कौल म्हणाले, 'याचा मोठा इतिहास आहे. हे तीर्थांचे तीर्थ आहे. तीर्थराज लोकभवन जेथे खुद्द शेषनागाचे रुपात आहे, तेथे सिद्ध लक्ष्मी विराजमान आहे. तेथे महाकाल भैरव आहे. तसेच, या कार्यासाठी आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आभारी आहोत. हा आपला वारसा आहे आणि आपला वारसा आहे, तर आपण आहोत, असेही कौल यावेळी म्हणाले.