१७ वर्षीय मुलीने यूट्युबवर व्हिडीओ पाहून दिला बाळाला जन्म, धक्कादायक माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 10:37 AM2021-10-28T10:37:31+5:302021-10-28T10:38:19+5:30
Kerala News: केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मलप्पुरम जिल्ह्यातील राहणाऱ्या १७ वर्षांच्या एका मुलीने युट्यूबवर व्हिडीओ पाहून स्वत:च स्वत:ची प्रसुती करून बाळाला जन्म दिला.
तिरुवनंतपुरम - केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मलप्पुरम जिल्ह्यातील राहणाऱ्या १७ वर्षांच्या एका मुलीने युट्यूबवर व्हिडीओ पाहून स्वत:च स्वत:ची प्रसुती करून बाळाला जन्म दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० ऑक्टोबर रोजी घरीच डिलिव्हरी झाल्यानंतर तीन दिवसांपर्यंत ती खोलीमध्येच राहिली. मात्र नंतर तिला संसर्ग झाल्यानंतर याची माहिती तिच्या आईला मिळाली. त्यानंतर तिच्या आईने तिला रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर आता तिची प्रकृती स्थिर आहे. मलप्पुरम जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट शाजेश बस्कर यांनी यांनी सांगितले की, रुग्णालयाने त्यांना डिलिव्हरीबाबत माहिती दिली आहे. तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली. या तरुणीची प्रकृती सुधारत आहे, तसेच तिचे बाळही सुखरूप आहे. मुलीच्या जबाबावरूरून पोलिसांनी परिसरातील २१ वर्षांच्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
बस्कर यांनी सांगितले की, मुलगी गर्भवती आहे आणि दोन दिवस प्रसुतीसाठी ती प्रयत्न करत होती, हे आईला माहिती नव्हते, ही बाब आश्चर्यकारक आहे. त्यांनी सांगितले की, या मुलीच्या ५० वर्षीय आईला दिसत नाही. तसेच तिचे वडील सुरक्षारक्षकाचे काम करतात. ते नेहमी नाईट ड्युटीवर असतात. ही तरुणी मोबाईल फोनसोबत खोलीतच राहत असे. त्यामुळे तिच्या आईला वाटे की ती ऑनलाईन क्लासमध्ये व्यस्त आहे.
पोलीस सुत्रांनी सांगितले की, अटक आरोपीने मुलीच्या घरातील परिस्थितीचा गैरफायदा घेतला. त्याने मुलीची गर्भनाळ कापण्याबाबत यूट्युबवर सर्च करण्याचा सल्ला दिला. हे दोघेही ही बाब लपवून ठेवू इच्छित होते. आता तपासांतर्गत तिला डीएनएस टेस्टसुद्धा करावी लागेल.