बंगळुरु - कर्नाटकची राजधानी बंगळुरुत अल्पवयीन 17 वर्षीय तरुणी 26 ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. पोलिसांनी तपास करत 4 नोव्हेंबर रोजी व्हाइटफील्डमधील क्लासिक इन लॉजमधून तरुणीची सुटका केली. तरुणीने या 10 दिवसांत नरकयातना सोसल्या असून पोलिसांना सर्व घटनेची सविस्तर माहिती दिली. तरुणीला लॉजमधील एका रुममध्ये 10 दिवस कोंडून ठेवण्यात आलं होतं. या 10 दिवसांत चार जणांनी मिळून आपल्यावर बलात्कार केल्याचं तरुणीने सांगितलं आहे.
केआर पुरम पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची ओळखही पटली आहे. राघवेंद्र (27), के मनोरंजन पंडित (52), के सागर (22) आणि मंजू राज (32) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लॉजमधून तरुणीची सुटका करण्यात आली तो मनोरंजन पंडित याच्या मालकीचा आहे.
तरुणीने सांगितलं आहे की, 'आपल्या एका कॉलेज मैत्रिणीने पार्टीसाठी मला बोलावलं होतं. 26 ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता मैत्रिणीने व्हाइटफिल्ड येथे रेल्वे स्टेशनजवळ भेटायला बोलावलं होतं. तेथूनच पार्टीत एकत्र जाणार होतो. मी पाच वाजता रेल्वे स्टेशनजवळ पोहोचली, पण माझी मैत्रीण रात्री 8 वाजता पोहोचली. जेव्हा मैत्रीण आली तेव्हा तिच्यासोबत अजून दोघेजण होते. तिने दोघांची ओळख राघवेंद्र आणि सागर म्हणून करुन दिली. पार्टीत घेऊन जाण्यासाठी हे दोघे आल्याचं तिने सांगितलं. मीदेखील त्यांच्यावर विश्वास ठेवला'.
डीसीपी अब्दुल अहद यांनी पीडित तरुणीची मैत्रीण यात सामील असल्याची शंका उपस्थित केली आहे. सध्या तपास सुरु आहे. तरुणीची मैत्रीण तिला रुम क्रमांक 6 मध्ये घेऊन गेली आणि इतर मित्र पार्टीसाठी अजून येत असल्याचं सांगितलं.
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, यानंतर आरोपी सागर रुममध्ये आला आणि त्याने बलात्कार केला. यानंतर राघवेंद्र आणि राज नावाच्या आरोपींनीही बलात्कार केला. लॉजच्या मालकाला ही गोष्ट कळल्यानंतर त्याने पोलिसांना कळवण्याची धमकी दिली. पण आरोपींनी कुठेही वाच्यता न करता तरुणीवर बलात्कार करु शकतोस असं सांगितल्यावर तोदेखील यांच्यात सामील झाला.
पोलिसांनी तरुणीची सुटका केली असून, वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.