गाझीपूर : उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे भाजीचा व्यवसाय करणारा व्यक्ती रातोरात कोट्यवधींचा मालक बनला. प्राप्तिकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्यावर ही बाब व्यावसायिकाच्या लक्षात आली. खरं तर नोटीस मिळाल्यानंतर व्यावसायिकाच्या कुटुंबीयांची झोपच उडाली. नोटीस मिळाल्यानंतर तो गोंधळला आणि कोणीतरी आपली फसवणूक केली असून आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करून खाते उघडून त्यात पैसे जमा केल्याचा आरोप केला.
प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्यानंतर झाला खुलासा दरम्यान, विनोद रस्तोगी यांचे कुटुंब गाझीपूर जिल्ह्यातील सेवाराई भागातील गहमर गावात राहते. विनोद रस्तोगी हे त्यांच्या परिसरात भाजीचा व्यवसाय करतात. विनोद रस्तोगी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आयकर विभागाने नोटीस बजावली असून तुमच्या खात्यात 172 कोटींहून अधिक रुपये जमा आहेत असे सांगण्यात आले. प्राप्तिकर विभागाकडून नोटीस मिळाल्यानंतर विनोद यांना धक्काच बसला. प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या नोटीसनंतर ते बँकेत गेले असता त्यांच्या नावाने आणि आधार क्रमांकाने दुसरे खाते उघडण्यात आल्याचे आढळून आले. त्या खात्यात 172 कोटी 81 लाख 59 हजार 153 रुपये जमा आहेत.
आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्याने आणि बँकेत जाऊन माहिती घेतल्यानंतर व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ झाले. व्यावसायिकाचे म्हणणे आहे की, हे खाते दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डसह इतर कागदपत्रांचा गैरवापर करून उघडले आहे. बँकेत जमा केलेला पैसा त्यांच्या मालकीचा नसून या पैशाशी त्याचा काहीही संबंध नाही. आता हे प्रकरण पोलिसांत पोहचले असून पोलीस ठाण्यातून सायबर सेलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, सायबर सेलमध्येही मदत झाली नसल्याचे या व्यावसायिकाचे म्हणणे आहे. न्याय मिळवण्यासाठी संबंधित व्यावसायिक पोलीस ठाणे आणि सायबर सेलच्या चकरा मारत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"