रांची - झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे मंडलच्या बाराबम्बो रेल्वे स्टेशनजवळ हावडा मुंबई एक्सप्रेसचा अपघात झालेला आहे. या रेल्वेचे १८ डबे रुळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जखमी झालेत. घटनास्थळी पोहचलेल्या रेल्वे कर्मचारी, एडीआरएम, पोलीस, प्रशासनाने जखमींना रेस्क्यू केले आहे. त्याचसोबत या ट्रेनमधील ८० टक्के प्रवाशांना चक्रधरपूर रेल्वे स्टेशनला पाठवलं आहे.
माहितीनुसार, १२१८० हावडा - सीएसएमटी एक्सप्रेस पहाटे ३.४५ वाजता चक्रधरपूर विभागातील राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो या दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाली. या ट्रेनचे १८ डबे रुळावरून घसरले. दुर्घटनेत २ मृत्युमुखी पडले. प्रशासनाकडून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. एनडीआरएफची टीमची बचाव कार्यात गुंतली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सिंहभूम आणि सरायकेला खरसावां जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत तात्काळ जखमींच्या उपचाराची व्यवस्था करावी असं सांगितले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. तर या दुर्घटनेत मुंबई हावडा मेल आणि एका मालगाडीचा समावेश असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
आदित्य ठाकरेंनी रेल्वेमंत्र्यांना घेरलं
दरम्यान, हावडा-मुंबई मेलला झालेल्या अपघाताबद्दल राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका करत रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट करत म्हटलंय की, मला गाड्यांबद्दल माहिती नाही, पण रेल्वेमंत्र्यांकडे काही तरी "कवच" नक्की आहे, ज्यामुळे त्यांच्या कार्यकाळात इतके रेल्वे अपघात होऊनही त्यांना हटवण्यात आलेले नाही.नदर आठवड्याला आपण काही अपघात पाहतो आणि त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्याऐवजी, जे रेल्वेमंत्री आहेत त्यांना भाजपा महाराष्ट्राचे निवडणुकीसाठी ‘राजकीय प्रभारी’ बनवण्यात आलं आहे. त्यांनी मंत्रालयावर लक्ष केंद्रित करायला नको का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.