प्रमोद आहेर, शिर्डीगेल्या वर्षभरात जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून जवळपास ९ लाख ९२ हजार भाविकांनी सशुल्क दर्शन, आरतीचा लाभ घेतला़ याद्वारे संस्थानला तब्बल १७ कोटी ९२ लाखांचे उत्पन्न मिळाले़ तर जनसंपर्क कार्यालयामार्फत ४ लाख ४० हजार फुकट्यांनीही व्हीआयपी दर्शनाची संधी लाटली़उत्पन्नाच्या नव्हे, तर गर्दी व्यवस्थापनाच्या हेतूने संस्थानने जनसंपर्क कार्यालयामार्फत देण्यात येणारे व्हीआयपी दर्शन पासेस शनिवार,रविवार व चार आरत्या सातही दिवस सशुल्क केले़ याशिवाय साईबाबांच्या वेबसाईटद्वारे कुणीही भाविक तीन दिवस अगोदर ऑनलाईन दर्शन पास काढू शकतो़ या दोन्हीही सुविधेत काकड आरतीसाठी पाचशे,अन्य आरत्यांसाठी तीनशे, तर दर्शनासाठी प्रत्येकी शंभर रूपये देणगी स्वरूपात आकारले जातात़वर्षभरात ऑनलाईन पासेस काढून ५ लाख ९७ हजार भाविकांनी सशुल्क दर्शन व आरतीचा लाभ घेतला़ यातून संस्थानला १० कोटी ३८ लाखांचे उत्पन्न मिळाले,तर संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयामार्फतही ३ लाख ९५ हजार भाविकांना व्हीआयपी पासेस सशुल्क देण्यात आले़याद्वारेही संस्थानला ७ कोटी ५३ लाखांचे उत्पन्न मिळाले़याशिवाय जनसंपर्क कार्यालया मार्फत प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या काळात ४ लाख ४० हजार तथाकथीत व्हीआयपींनीही फुकटचा पास काढून दर्शन घेतले़ कोणत्याही शिफारशीशिवाय सातही दिवस दर्शन,आरत्या सशुल्क केल्या तर सामान्य भाविकही या सेवेचा लाभ घेईल, यातील गोरखधंदे बंद होतील़ याद्वारे मिळणारे उत्पन्न भाविकांना अधिकची चांगली सुविधा देण्यासाठी वापरता येईल़या वर्षात जवळपास ३ लाख १३ हजार भाविकांनी सशुल्क पासेस काढून साईदरबारी चारही आरत्यांना हजेरी लावली़ यात सर्वाधिक ८७ हजार भाविकांनी काकड आरतीला, तर सर्वात कमी ७१ हजार भाविकांनी शेजारतीला जाणे पसंत केले़ रोज जवळपास साडेआठशे भाविक सशुल्क पास काढून चार आरतींना हजेरी लावतात़ यात प्रत्येक आरतीला सरासरी दोनशे ते सव्वादोनशे भाविक असतात़ याशिवाय रोज सरासरी बाराशे भाविक ऑनलाईन पास काढून सशुल्क दर्शन घेतात, तर सोमवार ते शुक्रवार या काळात रोज सोळाशेहून अधिक भाविक जनसंपर्क कार्यालया मार्फत फुकट दर्शन पासेसचा लाभ उठवतात़
वर्षभरात सशुल्क साईदर्शनातून १८ कोटी
By admin | Published: December 31, 2014 12:05 AM