एस. पी. सिन्हा, लाेकमत न्यूज नेटवर्क
पाटणा :बिहारमध्ये होळीच्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यांत किमान दीड डझनपेक्षा जास्त लोकांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला आहे. बांका, भागलपूर, मधेपुरातील घटना विषारी दारूशी जोडून पाहिल्या जात आहेत. अनेक मृतांच्या कुटुंबीयांनी व स्थानिकांनी विषारी दारू पिण्यात आल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा दावा केला असला तरी पोलीस आणि प्रशासनाने तो फेटाळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बांका जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांत महिलेसह ८ जणांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला, तर अनेक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक अरविंद कुमार गुप्ता म्हणाले की, कोणाचेही शवविच्छेदन करा, अशा सूचना नाहीत. अमरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लौसा गावातही एकाचा मृत्यू झाला.
भागलपूर जिल्ह्यात होळीच्या दिवशी विषारी दारू पिण्यात आल्यामुळे ७ जणांचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला. अनेक जण आजारी आहेत. मृतांच्या कुटुंबीयांचे म्हणणे असे की, होळीच्या दिवशी ते दारू प्यायले होते. अभिषेक कुमार उर्फ छोटू साह (२४) याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली आहे. उपपोलीस अधीक्षक प्रकाश कुमार म्हणाले की, आतापर्यंत ३ मृत्यूंना दुजोरा मिळाला असला तरी हे मृत्यू कसे झाले याची स्पष्ट माहिती मिळालेली नाही. लोकांचे म्हणणे असे की, हे मृत्यू विषारी दारूमुळे झाले आहेत. मधेपुरा जिल्ह्यात ४ जणांचा संदिग्ध मृत्यू झाला असून हे मृत्यूही विषारी दारूमुळे झाल्याचे सांगितले.