प्राप्तिकर विभागाकडून मयूर ग्रुपवर टाकण्यात आलेल्या धाडीची कारवाई पाच दिवसांनंतर समाप्त झाली आहे. या धाडीमधून १८ किलो सोनं, ५० किलो चांदी आणि ३.५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच मयूर ग्रुपमध्ये सुमारे १५० कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे समोर आले आहे. सध्या जप्त करण्यात आलेले लॅपटॉप आणि संगणकांमधून माहितीचं विश्लेषण सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर करचोरीचा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तत्पूर्वी डीआरआरने मयूर ग्रुपच्या मालकांविरोधात १०० कोटी रुपयांहून अधिकच्या करचोरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली होती.
देशातील सर्वात मोठी वनस्पती तूप निर्माता कंपनी असलेल्या मयूर ग्रुपच्या कानपूरसह देशातील विविध ठिकाणांवर धाड टाकण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर ग्रुपच्या मालकांच्या कानपूरमधील विविध ठिकाणांवरून १८ किलो सोनं, ५० किलो चांदी आणि ३.७ कोटी रुपये कॅश जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाच दिवसांच्या तपासामध्ये ४०० कोटी रुपयांच्या उत्पन्नावरील सुमारे १०० कोटी रुपयांच्या करचोरीची माहिती समोर आली आहे. त्याबरोबरच SAFTA चं उल्लंघन करून ५० कोटी रुपयांची करचोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचं कर्ज आणि प्राप्तिकर दाखल न करणाऱ्यांकडून २२ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारांचाही उलगडा झाला आहे.