पालनपूर, दि. 27 - गुजरातमध्ये महापुराने थैमान घाततं असून एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. खरिया गावात ही दुर्देवी घटना घडली आहे. बुधवारी या सर्वांचे मृतदेह हाती लागले असता सर्वांना धक्काच बसला. अशाप्रकारे एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते. नदीमधून सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा 119वर पोहोचला आहे. बचावकार्य अद्यापही सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
खरिया गावातील लोकांना जेव्हा एकामागोमाग एक मृतदेह सापडत होते तेव्हा त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मृतदेहांचे शोध घेत असता एकाच वेळी हे सर्व मृतदेह हाती लागले. हे सर्वजण ओबीसी ठाकोर समुदायातील होते. मृतांमध्ये आठ महिला आणि एका आठ वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे.
मुसळधार पावसामुळे बनास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. ज्यानंतर खऱियासहित 30 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 'हे सर्वजण मंगळवारी मध्यरात्री वाहून गेले असल्याची शक्यता आहे', असं व्ही एम पाटील या अधिका-याने सांगितलं आहे. सध्या बचावकार्य सुरु असून लष्कर जवान, एनडीआरएफ आणि बीएसएफच्या तुकड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. भारतीय हवाई दलाची 10 हेलिकॉप्टर्स बचावकार्यात मदत करत आहेत.
धारोई धरणातून 1.24 लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यानंतर भावनगर - अहमदाबाद हायवेवरदेखील पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जवळ असणारी सर्वा गावे आधीच रिकामी करण्यात आली होती. 20 गावांमधील जवळपास 3858 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी अवंतिका सिंह औलख यांनी सांगितलं आहे.
दंतीवाडा तालुक्यातील दाभिपुरा गावातील पुराचं पाणी तीन दिवसांनी कमी झालं असता गावकरी माघारी परतले. मात्र आपलं जे काही होतं ते सगळं नष्ट झाल्याचं पाहून त्यांच्या भावना अनावर झाल्या. 'आम्ही सगळंच गमावून बसलो आहोत. आम्ही साठवलेलं धान्यही वाहून गेलं. आमच्या घरांना तडे गेले आहेत', असं एका गावक-याने सांगितलं.
बुधवारी जवळपास 650 लोकांना पुरातून वाचवण्यात आलं. यापैकी 272 जणांना एअरलिफ्ट करुन सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.