नवी दिल्ली : मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसला बाजूला ठेवून विरोधकांची मोट बांधण्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आता दिल्लीतही प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या कन्या के. कविता यांच्या नेतृत्वात विरोधातील १८ पक्षांचे नेते एकत्रित येणार असून ते जंतरमंतरवर शुक्रवारी धरणे देणार आहेत.
काही दिवसांपूर्वी के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबाद येथे विरोधकांचे संमेलन घेतले होते. यात काँग्रेसला सहभागी करून घेतले नव्हते. आता दिल्लीतही होणाऱ्या आंदोलनात काँग्रेसला बाजूला ठेवले आहे. ईडीतर्फे देशातील विरोधकांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. या विरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे दिले जाणार आहे. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता करणार आहेत. या धरणे आंदोलनात विरोधी पक्षातील १८ पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोण सहभागी?यात धरणे आंदोलनात महाराष्ट्रातील ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, एनसीपीच्या नेत्या सीमा मलिक सहभागी होणार आहेत. याशिवाय कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, डी. राजा, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांच्याशिवाय समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते सहभागी होणार आहेत; परंतु या धरणे आंदोलनासाठी काँग्रेसला बाजूला ठेवले आहे.
तरुणांना नोकऱ्या का नाहीत? जर सरकारी संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो, तर अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांचा कार्यकाळ का वाढवला जाऊ शकत नाही. तरुणांना नोकऱ्या का नाहीत? अधिक अनुदान व नोकऱ्या देण्याचे आवाहन पंतप्रधानांना करताना सामान्यांना त्रास देऊन तुम्हाला काय मिळते, असा सवालही कविता यांनी केला.
ईडीला सामोरे जाऊ, काहीही चुकीचे केलेले नाहीमला दिल्ली उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) ९ तारखेला हजर होण्याची नोटीस मिळाली. नियोजित आंदोलन करून ईडीला सामोरे जाऊ, आपण काहीही चुकीचे केलेले नाही. के. कविता, भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या