नवी दिल्ली : मानव आणि अन्य सजीवांवर ज्यांचा घातक परिणाम होऊ शकतो व नेमक्या याच कारणाने जगातील अनेक देशांमध्ये ज्यांच्या वापरावर पूर्ण प्रतिबंध लागू केले गेले आहेत अशा १८ किटकनाशकांवर बंदी लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.यासाठीच्या प्रस्तावित बंदी आदेशाचा मसुदा सर्व संबंधितांकडून हरकती व सूचना मागविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने अलिकडेच प्रसिद्ध केला आहे. त्यासाठी ४५ दिवसांचा वेळ आहे. त्यानंतर हरकती व सूचनांवर विचार करून अंतिम बंदी आदेश पुढील महिन्यात जारी केला जाईल, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.यासंबंधीच्या अधिसूचनेच्या सहपत्रांमध्ये यापैकी कोणत्या किटकनाशकाने सजीवांवर कोणते घातक परिणाम होऊ शकतात, याचा तपशील दिलेला आहे. ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक अनुपम वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षांपूर्वी नेमलेल्या समितीच्या शिफारशींनुसार सरकार ही बंदी घालणार आहे. यापैकी काही किटकनाशके मधमाश्या व पक्ष्यांसाठी खूपच विषारी आहेत व त्यांच्या फवारणीने जलसाठेही प्रदूषित होऊन जलचर प्राण्यांवरही हानीकारक परिणाम होतात, असे सरकारने नमूद केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१८ कीटकनाशकांवर बंदी?
By admin | Published: January 09, 2017 1:42 AM