Gujarat Crime News : गुजरातच्या भरुच जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शाळेत मुख्याध्यापकाने रागाच्या भरात शिक्षकावर हल्ला केला. अवघ्या काही सेकंदात त्याने त्या शिक्षकाला 18 थप्पड लगावल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, आरोपी मुख्याध्यापकाविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आरोपीविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरुचमधील जंबुसर शहरातील नवयुग शाळेत ही घटना घडली. हितेंद्रसिंग ठाकोर असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव असून, राजेंद्र परमार असे पीडित शिक्षकाचे नाव आहे. गणित आणि विज्ञानाचे वर्ग चुकीच्या पद्धतीने हाताळले जात असल्याच्या तक्रारीवरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी मुख्याध्यापकाने शिक्षकाला चर्चा करण्यासाठी आपल्या केबिनमध्ये बोलावले होते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ठाकोर आपल्या केबिनमध्ये बसून राजेंद्र परमार यांच्याशी बोलत असल्याचे दिसत आहे. तिथे इतर काही सहकारीही बसले होते. अचानक ठाकोर खुर्चीवरून उठतो आणि राजेंद्र परमारला मारहाण करू लागतो. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुख्याध्यापकांविरुद्ध तक्रार केली. भरुचच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले असून, संस्थेच्या व्यवस्थापनाने चौकशीदरमयान आरोपीस शाळेत येऊ देण्यास मनाई केली आहे.