बिहारच्या मुंगेरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका १८ वर्षीय मुलीने तिच्या कुटुंबाकडून १.५ लाख रुपयांचा आयफोन मागितला होता. आयफोन (Iphone) न मिळाल्याने तिने ब्लेडने स्वतःचं मनगट कापून घेतलं. तसेच मुलीने ब्लेडने अनेक ठिकाणी वार करून स्वतःला जखमी केलं आहे. या घटनेनंतर तिला उपचारासाठी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुलगी तीन महिन्यांपासून तिच्या आईकडे आयफोनची मागणी करत होती. मुलगी तिच्या बॉयफ्रेंडशी बोलण्यासाठी आयफोनची मागणी करत होती. मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचं देखील म्हटलं जात आहे. पण जेव्हा तिच्या आईने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देत तिला आयफोन देण्यास नकार दिला तेव्हा मुलीने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आणि भयानक पाऊल उचललं.
मुलीने मनगटावर ब्लेडने वार करायला सुरुवात केली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा बॉयफ्रेंड अजूनही शिकत आहे आणि म्हणून तो तिला फोन घेऊ शकला नाही. त्यामुळे तिला त्याच्याशी बोलण्यात अडचण येत होती. म्हणूनच तिने दीड लाख रुपयांचा आयफोन मागितला. पण मुलीच्या आईने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही, ते इतका महागडा मोबाईल खरेदी करू शकत नाहीत.
पतीच्या कष्टातून मिळवलेल्या पैशातून घराचा खर्च भागवला जातो. आता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलीने ती पुन्हा कधीही असं चुकीचं पाऊल उचलणार नाही असं वचन दिलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे, हातावरच्या जखमा खोल नाहीत. सध्या डॉक्टर जखमेवर उपचार करत आहेत जेणेकरून नंतर त्याचे अल्सरमध्ये रूपांतर होऊ नये. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.