Samaira Hullur : कमी वयात काहीतरी करण्याची जिद्द अनेक जण आपल्या उराशी बाळगून असतात. अशीच जिद्द अन् कठोर मेहनत करून कर्नाटकातील विजयपूर येथील एक मुलगी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी पायलट बनली आहे. कर्नाटकच्या समायरा हुल्लूरने हे यश संपादन करून इतिहास रचला आहे. ती भारतातील सर्वात कमी वयातील व्यावसायिक पायलट बनली आहे.
समायरा ही उद्योगपती अमीन हुल्लूर यांची मुलगी आहे. समायरा हुल्लूर हिने व्यावसायिक पायलट परवाना (CPL) मिळवला आहे. व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी ती भारतातील सर्वात तरुण पायलट ठरली आहे. समायराने विनोद यादव एव्हिएशन ॲकॅडमीमध्ये सहा महिन्यांचे विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.
ॲकॅडमीचे संस्थापक विनोद यादव आणि कॅप्टन तपेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे पहिल्याच प्रयत्नात सीपीएलच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या. समायराने आपल्या यशाचे श्रेय तिचे कॅप्टन तपेश कुमार आणि विनोद यादव यांना दिले. ती म्हणाली, प्रशिक्षण कठीण होते, पण कॅप्टनच्या पाठिंब्यामुळे ते सोपे झाले. माझ्या यशाचे सर्व श्रेय कॅप्टन तपेश कुमार आणि विनोद यादव यांना जाते.
समायराने पायलटिंगसह सहा अनिवार्य कोर्समध्ये देखील भाग घेतला होता. यासोबतच लेखी परीक्षेतही तिने चांगली कामगिरी केली. तसेच, समायराने महाराष्ट्रातील बारामती येथील कार्व्हर एव्हिएशन ॲकॅडमीमध्ये सात महिन्यांचे उड्डाण प्रशिक्षण घेतले, जेथे समायराला विमान वाहतुकीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. कार्व्हर एव्हिएशन ॲकॅडमीमध्ये तांत्रिक कौशल्य मिळाले नसल्याचे तिने सांगितले. तसेच, कॅप्टन तपेश कुमार माझ्यासाठी प्रेरणास्थान असल्याचे समायरा म्हणाली.
कॅबिनेट मंत्री मल्लनगौडा बसनगौडा पाटील उर्फ एमबी पाटील यांनीही समायरा हिचे अभिनंदन केले आहे. समायराचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यांनी लिहिले की, "देशातील सर्वात तरुण पायलट समायरा हुल्लूर हिचे हार्दिक अभिनंदन, जिने राष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा आणि राज्याचा गौरव वाढवला आहे. वयाच्या १८ व्या वर्षी एवढे मोठे यश मिळणे ही मोठी गोष्ट आहे. मला आशा आहे की, विजयपूरच्या या युवा प्रतिभेचे भविष्य उज्ज्वल असेल."