नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एका बनावट पोलीस इंस्पेक्टरचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. पोलिसांची वर्दी घालून वावरणाऱ्या या बनावट इंस्पेक्टरचे नाव मुकेश यादव आहे, जो मूळचा उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवासी असून टोल टॅक्स वाचवण्यासाठी पोलिसांची वर्दी घालायचा. एवढेच नाही तर तो व्यक्ती बनावट पोलीस बनून वाहन चालकांकडून अवैध वसुली देखील करायचा. हा प्रकार स्थानिक तुंडला पोलिसांना कळताच त्यांनी तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे वजन तब्बल 180 किलो असल्याचा पोलिसांचा दावा आहे. आता त्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? तुंडला पोलीसचे अधिकारी हरिमोहन सिंग यांनी रविवारी सांगितले की, शनिवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहनांमधून अवैध वसुली झाल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर या व्यक्तीला अवैध वसुली करताना रंगेहाथ पकडण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. बनावट इंस्पेक्टर बनून राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनांकडून त्यांना धमकावून आणि वाहने जप्त करण्याची धमकी देऊन त्यांची अवैध वसुली करत असल्याचे सांगण्यात आले. टोल टॅक्स वाचवण्यासाठी तो पोलिसांची वर्दी घालून हा प्रताप करत होता.
वाहनांकडून करायचा अवैध वसुलीलक्षणीय बाब म्हणजे आरोपी मुकेशकडून दोन आधारकार्ड, दोन पॅनकार्ड, पोलिसांची वर्दी, बनावट आयकार्ड, एटीएम आदी कागदपत्रांशिवाय एक वॅगनआर कारही जप्त करण्यात आली आहे. त्यावर 'पोलीस' अशा आशयाचे मोठे स्टिकर देखील लावण्यात आले होते. यादरम्यान त्याचे दोन साथीदारही होते, ज्यांच्या मदतीने तो खासगी बस आणि ट्रक तपासण्याच्या नावाखाली अवैध वसुली करायचा. पोलीस अधिकारी हरिमोहन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची चौकशी सुरू आहे. त्याच्या टोळीत किती लोक सामील आहेत, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.