नवी दिल्ली-
बँकांना चुना लावून कोट्यवधी रुपये बुडवून देश सोडून फरार झालेल्या आरोपींकडून पैसान् पैसा वसुल करण्याच्या मोहिमेत केंद्र सरकार वेगानं काम करत आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार बँकांनी आतापर्यंत फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याकडून १८ हजार कोटी रुपये वसुल केले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. मेहता म्हणाले की, "पीएमएलए अंतर्गत न्यायालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, ईडीने विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि चोकसी यांच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत १८,००० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे"
बँकांनी जुलै महिन्यापर्यंत तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपींची मालमत्ता विकून १३,१०९ कोटी रुपये वसुल केले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिसेंबर २०२१ मध्ये दिली होती. आता ताज्या वसुलीत ७९२ कोटी रुपये आणखी वसुल करण्यात आले आहेत.