नवी दिल्ली : २०२२ मध्ये जम्मू- काश्मीरमध्ये एकूण १८७ दहशतवादी मारले गेले आणि १११ दहशतवादविरोधी कारवाया करण्यात आल्या, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. भाजप खासदार सुशीलकुमार मोदी यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
२०२२ मध्ये १२५ दहशतवादी घटना घडल्या. दहशतवादी आणि लष्करामध्ये ११७ चकमकी झाल्या. २०२१ मध्ये १८० दहशतवादी मारले गेले आणि ९५ दहशतवादविरोधी कारवाया करण्यात आल्या. यासह २०२१ मध्ये १०० चकमकी आणि १२९ दहशतवादी घटनांची नोंद झाली.
बीएसएफने पाडले पाकचे ड्रोन सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बुधवारी पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने येणारे ड्रोन पाडले. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार “आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हे ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीत पडले.” पंजाबच्या अमृतसर सेक्टरमधील बाबापीर सीमा चौकीजवळ ७-८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली. बीएसएफच्या जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला, त्यानंतर परतणारे ड्रोन आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत पडले.