नवी मुंबई : वन कॉइन या मार्केटिंग कंपनीच्या सेमिनारवर केलेल्या कारवाईनंतर पोलिसांनी कंपनीची चार बँक खाती गोठवली आहेत. दिल्ली व राजस्थानमधील ही बँक खाती असून त्यात १८ कोटी ९७ लाख रुपये आढळले. त्यामुळे गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आॅनलाइन गुंतवणुकीच्या माध्यमातून बेकायदेशीर ठेवी जमा करणाऱ्या वन कॉइन या विदेशी कंपनीच्या सेमिनारवर छापा टाकून नवी मुंबई पोलिसांनी १८ एजंटांना अटक केली आहे. त्या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता असल्याने चौकशीसाठी त्यांचा पुन्हा ताबा मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे. तरीही दोन दिवसांच्या चौकशीत पोलिसांनी गुंतवणूकदारांकडून घेतली जाणारी रक्कम ज्या बँक खात्यात जमा केली जायची अशा खात्यांची माहिती मिळवली होती. त्यानुसार दिल्ली व राजस्थानमधील चार बँक खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली होती. चौकशीत त्या चारही खात्यामध्ये एकूण १८ कोटी ९७ लाख रुपये असल्याचे समोर आले. यानुसार चारही बँक खाती गोठवल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. ही चारही बँक खात्यामध्ये गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम जमा केली जायची. मात्र वन कॉइन अथवा वन लाइफ या कंपनीच्या नावाऐवजी वेगळ्याच नावाने ही खाती असल्याचे समजते. त्यामुळे गोठवलेल्या चार बँक खात्यांमध्ये व्यवहार झालेल्या इतरही खात्यांची व खातेधारकांची चौकशी केली जाणार असल्याचे उपआयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘वन कॉइन’च्या चार खात्यांत १९ कोटी
By admin | Published: April 27, 2017 2:04 AM