नवी दिल्ली: पुलवामातील हल्ला, त्यानंतर भारत-पाकिस्तानचे ताणलेले संबंध, भारताचा एअर स्ट्राइक, विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका या घडामोडी सुरू असताना दहशतवाद्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. पुलवामा हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींवर नजर टाकल्यास भारतीय हवाई दल, जम्मू लष्कर पोलीस, सीआरपीएफला मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय सुरक्षा दलांची मोठी हानी झाली आहे. याशिवाय अनेक कुटुंबांनी त्यांच्या घराचा आधार गमावला आहे. 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दहशतवादी हल्ला झाले. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यानंतर 12 दिवसांनी भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र या कारवाईच्या आधी आणि नंतरही देशासाठी प्राण अर्पण केलेल्या जवानांची संख्या चिंताजनक आहे. 1. एका मेजरसह पाच जवान शहीद (18 फेब्रुवारी)पुलवामातील हल्ल्यानंतर सारा देश शोकसागरात बुडाला असताना चारच दिवसांनंतर पुलवामात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चमकक झाली. यामध्ये लष्कराच्या पाच जवानांना वीरमरण आलं. त्यात एका मेजरचा समावेश होता. दहशतवाद्यांशी दोन हात करताना 55 राष्ट्रीय रायफल्सचे मेजर विभूती शंकर धोंडियाल यांना वीरमरण आलं. याच चकमकीत हरी सिंह, शेओ राम, अजय कुमार, अब्दुल रशीद शहीद झाले. 2. आयईडी नष्ट करताना मेजर शहीद17 फेब्रुवारीला मेजर चित्रेश सिंग बिश्त स्फोटकं नष्ट करताना शहीद झाले. जम्मू-काश्मीरच्या राजौरीत त्यांनी हौतात्म्य पत्करलं. 7 मार्चला त्यांचा विवाह होणार होता. 3. कुलगाममधील चकमकीत एक डीएसपी आणि एक लष्करी जवान शहीद25 फेब्रुवारीला कुलगाममधील तुरीगाममध्ये डीएसपी अमन कुमार ठाकूर यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. त्यांच्यासोबत हवालदार सोमबीर यांनीही हौतात्म्य पत्करलं. यावेळी स्थानिकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली होती. 4. हंडवाडात सीआरपीएफचे 5 जवान शहीदउत्तर काश्मीरच्या हंडवाडात 1 मार्चला दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. ही चकमक जवळपास 58 तास चालली. यामध्ये पाच जणांना वीरमरण आलं. सीआरपीएफच्या तीन आणि जम्मू काश्मीरच्या दोन पोलिसांनी देशासाठी प्राणांचं बलिदान दिलं. 5. बडगाममध्ये एमआय 17 हेलिकॉप्टरला अपघात; हवाई दलाच्या 6 अधिकाऱ्यांचा मृत्यू27 फेब्रुवारीला पाकिस्ताननं भारतीय हवाई हुद्दीत घुसखोरी केली. विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 विमान जमीनदोस्त केलं. याच दिवशी बडगाममध्ये एमआय 17 हेलिकॉप्टर कोसळलं. यामध्ये हवाई दलाच्या 6 अधिकाऱ्यांना वीरमरण आलं.
दुःखद... पुलवामा हल्ल्यानंतर 17 दिवसांत 19 जवानांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 2:30 PM