मुजफ्फरपूर - बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 19 मुलांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच दिवसांत मुजफ्फरपूरमध्ये इन्सेफेलाईटीस या आजाराने 19 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एसकेएससीएच या रुग्णालयात 15 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर खासगी रुग्णालयांमध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एसकेएमसीएच मुजफ्फरपूरचे अधीक्षक डॉ. सुनील शाही यांनी शनिवारी रुग्णालयात इन्सेफेलाईटिस या आजाराने ग्रस्त असलेल्या 38 मुलांना दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच यातील 14 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. तसेच अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात मुलांना ताप येतो. त्यांच्यावर सध्या अनेक रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुले या इन्सेफेलाईटीस तापाने दगावतात. गेल्या वर्षीही या आजाराने 22 मुलांचा मृत्यू झाला होता. दरवर्षी पावसाळ्याआधी हा आजार होत असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिले आहे.
2014 पासून इन्सेफेलाईटिस हा आजार मुलांना होत आहे. पाच ते दहा वयोगटातील मुलांना हा आजार होतो. तसेच यामुळे दरवर्षी अनेक मुलांचा मृत्यू होतो. मात्र तरीही सरकारने याबाबत अज्ञाप गंभीर दखल घेतलेली नसल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. डोकं दुखणं, अशक्तपणा येणं, उलट्या होणं, भूक न लागणं, अतिसंवेदनशील होणं ही या आजाराची लक्षणं आहेत. त्यामुळे अशा गोष्टींचा त्रास होत असल्याचं त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच अस्वच्छ पाण्यापासून दूर राहा, आरोग्याची नीट काळजी घ्या. मच्छारांपासून लांब राहा असे उपाय या आजारापासून वाचण्यासाठी करता येतात.