लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कामकाजात व्यत्यय आणल्याने राज्यसभेतील १९ विरोधी पक्षाच्या सदस्यांना मंगळवारी आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सात, द्रमुकच्या सहा, तेलंगणा राष्ट्र समितीच्या तीन, माकपाच्या दोन आणि भाकपाच्या एका सदस्याचा समावेश आहे. त्यांना शुक्रवारपर्यंत राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही.
पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षाचे सदस्य महागाई व दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटीच्या मुद्यावरून सभागृहाचे कामकाज ठप्प पाडत आहेत. सोमवारी कामकाज ठप्प पाडत असल्याबद्दल लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या ४ लोकसभा सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केले होते. मंगळवारीही याच मुद्यांवरून विविध घोषणा देत ते सभापतींसमोरील हौद्यात उतरले. उपसभापती हरिवंश यांनी त्यांना परत जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे उपसभापतींनी सत्ताधारी सदस्यांना त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यास सांगितले.
कामकाज तीन वेळा तहकूबnसंसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी १० विरोधी सदस्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. मात्र, उपसभापतींनी हा ठराव मतदानाला टाकताना १९ जणांची नावे घेतली. आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर करण्यात आला. nनिलंबित सदस्यांनी सभागृहाबाहेर जाण्यास नकार देत जागेवरच फतकल मारली. त्यामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले. पहिल्यांदा १५ मिनिटांसाठी, त्यानंतर एक तासासाठी आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.