छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. १९ पैकी ९ नक्षलवाद्यांवर एकूण २८ लाख रुपयांचे बक्षीस होते. या नक्षलवाद्यांनी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. अमानवी माओवादी विचारसरणी, वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून निष्पाप आदिवासींचे शोषण आणि बंदी घातलेल्या संघटनेतील वाढत्या मतभेदांमुळे आपण आत्मसमर्पण केल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती विजापूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी दिली.
सुरक्षा दलांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्यावर परिणाम झाला आहे, यामध्ये छावण्या उभारणे याचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत, अधिकारी अंतर्गत भागात मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यादव म्हणाले की, आत्मसमर्पण केलेले सर्व नक्षलवादी आंध्र ओडिशा बॉर्डर विभाग आणि माओवाद्यांच्या पामेड एरिया कमिटीमध्ये विविध पदांवर सक्रिय होते.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी देवा पदम (३०) आणि त्यांची पत्नी दुले कलामू (२८) हे माओवादी बटालियन क्रमांक १ चे वरिष्ठ सदस्य म्हणून सक्रिय होते आणि त्यांच्या डोक्यावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस होते. एरिया कमिटी सदस्य सुरेश कट्टम (२१) यांच्या डोक्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते, तर आत्मसमर्पण केलेल्या एका नक्षलवाद्याच्या डोक्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते आणि इतर पाच जणांच्या डोक्यावर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नक्षलवाद्यांना प्रत्येकी २५,००० रुपयांची मदत
जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर्स, स्पेशल टास्क फोर्स, CRPF आणि त्यांची एलिट युनिट COBRA यांनी त्यांच्या आत्मसमर्पणात महत्त्वाची भूमिका बजावली. आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना प्रत्येकी २५,००० रुपयांची मदत देण्यात आली आणि सरकारी धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.