नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. या गदारोळामुळे राज्यसभेतील 19 खासदारांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये मौसम नूर, एल. यादव, व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, सुष्मिता देव, शांता छेत्री, मोहम्मद अब्दुल्ला, ए.ए. रहीम, कनिमोझी, डॉ. शांतनु सेन, नदीम-उल-हक आणि डोला सेन यांचा समावेश आहे.
सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्याप्रकरणी राज्यसभाखासदारांना निलंबित करण्यात आले आहे. अन्य निलंबित खासदारांमध्ये आर वड्डीराजू, एस कल्याणसुंदरम, आर गिरंजन, एन आर एलांगो, एम षणमुगम, दामोदर राव दिवाकोंडा आणि पी संदोष कुमार यांचा समावेश आहे. यापूर्वी राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला होता. त्यावेळी उपसभापतींनी कडकपणा दाखवत सभागृहात घोषणाबाजी करणाऱ्या आणि टाळ्या वाजवणाऱ्या खासदारांना सांगितले की, हे नियमाविरुद्ध आहे.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधकांनी 'रोलबॅक जीएसटी'च्या घोषणा दिल्या. उपसभापतींनी घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांना सांगितले की, कृपया तुमच्या जागेवर जा. तुम्ही सभागृहाचे कामकाज चालू देत नाही, हे संपूर्ण देशाला दिसत आहे. खासदारांच्या निलंबनावर टीएमसीचे राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन म्हणाले की, मोदी आणि शाह यांनी लोकशाही निलंबित केली आहे. खासदारांबद्दल काय बोलताय?
दरम्यान, काल लोकसभेत गदारोळ झाला होता. महागाईविरोधात घोषणाबाजी केल्याने काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेचे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. काँग्रेस खासदारांनी हातात फलक घेऊन सभागृहात घोषणाबाजी केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना इशारा दिला होता की, सभागृहात फलक घेऊन आलेल्या कोणत्याही खासदाराला कामकाजात भाग घेऊ दिला जाणार नाही. यानंतर काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमनी, राम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना निलंबित करण्यात आले.
देशात सध्या विविध मुद्द्यांवरून राजकारण तापले आहे. अशातच या खासदारांचे निलंबन झाल्याने विरोधक आता आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. खासदारांच्या निलंबनावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. खासदारांना निलंबित करून सरकार आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे, सामान्य जनतेला जे मुद्दे आहेत तेच खासदार मांडण्याचा प्रयत्न करत होते, असे पक्षाने म्हटले होते.