गुजरातमधील जामनगरमध्ये गरबा खेळण्याचा सराव करणाऱ्या एका मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मुलाचं वय फक्त 19 वर्षे होतं. तो गरबा क्लासमध्ये गरबा खेळण्याचा सराव करत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
विनीत मेहुलभाई कुंवरिया असं या मुलाचं नाव असून तो जामनगरमध्ये राहत होता. मामा दर्शन जोशीपुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनीत गेली तीन-चार वर्षे सातत्याने गरबा स्पर्धेत भाग घेत होता. नवरात्र येण्यापूर्वीच तो गरबा-दांडियाचा सराव सुरू करायचा. बुधवारी संध्याकाळीही तो सरावासाठी गेला होता. क्लासमध्ये तो आपल्या ग्रुपसोबत सराव करत होता.
विनीतच्या मित्रांनी सांगितले की, विनीत अचानक बेशुद्ध झाला आणि जमिनीवर पडला. त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो शुद्धीवर आला नाही. विनीतला त्याच्या मित्रांनी ऑटोमधून हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तपासणी केल्यानंतर विनीतला मृत घोषित करण्यात आले. विनीतला हार्ट अटॅक आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी जामनगरमधील एका कार्डियक डॉक्टरचे वयाच्या 41 व्या वर्षी त्यांच्याच रुग्णालयात निधन झाले. जिम, क्रिकेटचे मैदान, शाळा आणि रस्त्यावर उभे असताना लोकांना हार्ट अटॅक येत आहे. कोरोनानंतर हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.