नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातील पौढी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर विधानसभा क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीची हत्या झाली आहे. 19 वर्षीय अंकिता मागील 18-19 सप्टेंबरपासून बेपत्ता होती. सोशल मीडियावर बेपत्ता तरूणीच्या बाजूने मोठे रान उठले होते. मात्र, अद्याप मुलीचा मृतदेह हाती लागलेला नाही. पोलीस आणि SDRF यांची टीम जिल्हापातळीवर अधिक तपास करत आहे.
पोलिसांनी याप्रकरणी भाजपा नेत्याचा मुलगा पुलकित आर्यसह तीन लोकांना अटक केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे अंकिता जिथे काम करत होती त्या रिसॉर्टचा संचालक हा पुलकित आर्यच होता. अंकिता बेपत्ता झाल्याचे समोर येताच रिसॉर्टचे संचालक आणि मॅनेजर फरार झाले होते.
पौडी गढवालमधील श्रीकोट गावची रहिवासी असलेली अंकिता भंडारी ही गंगा भोगपुर येथील एका खासगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. रिसॉर्टचे संचालक पुलकित आर्यने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, "रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी एका वेगळ्या रूममध्ये राहत होती. काही कालावधीपासून ती मानसिक तणावाचा सामना करत होती. यामुळेच 18 सप्टेंबर रोजी मी तिला ऋषिकेशला फिरायला घेऊन गेलो होतो." तसेच "रात्री उशिरा आम्ही तिथून परतलो. यानंतर रिसॉर्टमध्ये असलेल्या वेगवेगळ्या रूममध्ये आम्ही सगळेजण झोपायला गेलो. मात्र 10 सप्टेंबरच्या सकाळी अंकिता तिच्या रूममधून गायब झाली होती", अशी अधिक माहिती भाजपा नेत्याच्या मुलाने दिली.
रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांच्या विधानावरून संभ्रम आपली मुलगी बेपत्ता असल्याचे कळताच अंकिताचे वडील गंगा भोगपुरला पोहचले. यादरम्यान तरूणीच्या नातेवाईकांनी रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांना विचारपूस केली. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या माहितीमुळे संभ्रम निर्माण झाला. यानंतर रिसॉर्टचे संचालक आणि संबंधित कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे तक्रार नोंदवण्यात आली. याशिवाय अंकिता भंडारी बेपत्ता झाल्याप्रकरणी स्थानिक आमदार उमेश कुमार यांच्यासह पत्रकार आणि विविध संघटनांनी अंकितासाठी सोशल मीडियावरून आवाज उठवला. अखेर पोलिसांनी आरोपी रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, मॅनेजर, सौरभ भास्कर आणि सहकारी मॅनेजर अंकित गुप्ता या तिघांना अटक केली आहे.
पोलीस त्यांचे काम करत आहेत - CM धामीउत्तराखंडचेमुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी म्हटले की, ऋषिकेशमधील घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत पोलिसांना सक्त आदेश देण्यात आले आहेत. ज्यांनी कोणी अपराध केला आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली जाईल. पोलीस त्यांचे कार्य करत असून पोलीस पीडितेला न्याय देतील.