मोहाली:पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एक आश्चर्यजनक निर्णय दिला आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने 19 वर्षीय मुलगा आणि 21 वर्षीय मुलीला 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. त्याचे लग्नाचे वय अद्याप झालेले नाही, तरीदेखील तो प्रौढ असल्यामुळे त्याला त्याच्या आवडत्या व्यक्तीसोबत राहण्यापासून थांबवता येत नसल्याचेही कोर्टाने म्हटले.
याप्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधीश अरुण कुमार त्यागी म्हणाले की, याचिकाकर्ता प्रौढ झाला आहे. त्याला लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार आहे. दरम्यान, संबंधित तरुणाने मोहाली पोलिस स्टेशनमध्ये अर्ज देऊन मुलीच्या घरच्यांकडून जीवाचा धोका असल्याचे सांगत सुरक्षेची मागणी केली होती. यावर कोर्टाने प्रेमी युगुलाला सुरक्षा मिळवण्याचा अधिकार असल्याचेही नमुद केले.
प्रेमी यूगुलाला सुरक्षा पुरवाया जोडप्याने मुलीच्या घरच्यांकडून जीवाचा धोका असल्यामुळे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी हायकोर्टात याचिकादेखील दाखल केली होती. तरुणीच्या घरच्यांना तिचे इतर मुलासोबत लग्न लावायचे असून, आमच्या सोबत राहण्याला त्यांचा विरोध असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. यानंतर कोर्टाने त्यांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश पोलिसांना दिले.