तिरुवनंतपुरम: देवभूमी अशा ओळख असणारं सध्या केरळ भीषण पूर परिस्थितीचा सामना करत आहे. राज्यातील सर्व नद्यांना पूर आल्यानं होत्याचं नव्हतं झालं आहे. संपूर्ण भारतातून केरळला मदत केली जात आहे. याआधी शतकभरापूर्वीही केरळमध्ये महापूर आला होता. तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केरळसाठी मदतनिधी उभारला होता. त्यांनी पूरग्रस्तांसाठी 6 हजार रुपयांची मदत केली होती. केरळमधील पुरानं आतापर्यंत 290 लोकांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 10 लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. 1924 मध्ये आलेल्या पुरानं अशाच प्रकारे केरळमध्ये हाहाकार माजवला होता. त्यावेळीही हजारो लोक पुरामुळे बेघर झाले होते. तर अनेकांचा मृत्यू झाला होता. केरळमधील मलबार प्रांताला या पुराचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यावेळी महात्मा गांधींनी त्यांच्या 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या प्रकाशनांमधून केरळमधील पूर परिस्थितीची माहिती देणारे लेख प्रसिद्ध केले होते. यामधून त्यांनी केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. महात्मा गांधी यांच्या आवाहनानंतर देशभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचे असंख्य हात पुढे आले. आबालवृद्धांनी पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत केली. विशेष म्हणजे अनेक महिलांनी त्यांचे दागिने विकून मदतनिधी गोळा केला. याशिवाय खाऊसाठी साठवलेले पैसे पूरग्रस्तांसाठी देणाऱ्या लहानग्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. महात्मा गांधींनी त्यांच्या लेखांमध्ये याबद्दलचा उल्लेख केला आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करता यावी, यासाठी अनेकांनी एकवेळचं जेवण घेणं बंद केलं होतं. देशवासीयांनी केरळमधील पूरग्रस्तांना केलेली मदत अविश्वसनीय होती. देशातील नागरिकांनी आपल्या आवाहनाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला, असं महात्मा गांधी त्यांच्या लेखात म्हटलं होतं.
...जेव्हा महात्मा गांधींनी केरळमधील पूरग्रस्तांना केली होती 6 हजारांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 8:10 AM