नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील बनावट पदवी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉंड्रिंग चौकशी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मानव भारती विद्यापीठाची १९४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.
हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमधील १८६.४४ कोटी रुपये किमतीचे निवासी घर, व्यावसायिक इमारती, जमीन आणि ७.७२ कोटी रुपयांच्या सहा मुदत ठेवी तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या आहेत. सोलन येथील मानव भारती विद्यापीठ, माधव विद्यापीठ, मानव भारती चॅरिटेबल ट्रस्ट आणि ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार राणा यांच्या नावे ही संपत्ती आहे.
मानव भारती चॅरिटेबल ट्रस्टचे मानव भारती विद्यापीठ आहे. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची दखल घेऊन ईडीने मागच्या वर्षी आरोपीविरुद्ध मनी लॉंड्रिंग प्रतिबंध कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.राणा यांनी २०१९ मध्ये हरिणायातील कर्नालमधील आपल्या कार्यालयातून मानव भारती विद्यापीठाच्या बोगस पदव्यांचा घोटाळा केला, असा दावा ईडीने केला आहे. बनावट पदव्यांतून मिळालेल्या पैशातून राणा यांनी माऊंट अबू (राजस्थान) येथे माधव विद्यापीठ स्थापन केेले.