नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आभासी पद्धतीने पीएम-किसान योजनेचा नववा हप्ता जारी केला. या हप्त्यात एकूण ९.७५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १९,५०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.पीएम-किसान योजनेतील सगळे हप्ते मिळून आतापर्यंतच्या एकूण १.५७ लाख कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांच्या ३ हप्त्यांत एकूण ६ हजार रुपये एका वर्षात मिळतात. हा निधी केंद्र सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.फेब्रुवारी २०१९ च्या अर्थसंकल्पात पीएम-किसान योजनेची घोषणा करण्यात आली होती. डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या काळासाठी पहिला हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता.मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नवव्या हप्त्याच्या हस्तांतरण समारंभात बोलताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सांगितले की, नऊ हप्त्यांत मिळून १.३७ लाख कोटी रुपये सरकारने वितरित केले.किसान क्रेडिट कार्डद्वारे अर्थसाह्य तोमर यांनी सांगितले की, पीएम-किसान योजनेच्या २.२८ कोटी लाभार्थींना किसान क्रेडिट कार्ड योजनेचीही सवलत दिली आहे. त्याअंतर्गत त्यांना आतापर्यंत २.३२ लाख कोटी रुपयांची कर्ज सुविधा उपलब्ध झाली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर १९,५०० कोटी रुपये जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 5:57 AM