मुंबई/अहमदनगर - देशाच्या संसदेतील लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून २ युवकांनी सभागृहात उड्या घेत गोंधळ उडवून दिला. यावेळी, तरुणांनी रंगीत धुराचे फटाकेही फोडल्याने सभागृहातील खासदारांची मोठी धांदल उडाली होती. तर, संसदेच्या बाहेर अमोल शिंदे आणि निलम सिंह या त्यांच्या साथीदारांनीही सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. नही चलेगी.. नही चलेगी.. तानाशाही नही चलेगी असे म्हणत त्यांनी सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला होता. या चारही आरोपींना पोलिसांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेनं अनेकांना महाराष्ट्र विधानसभेतील ८ जुलै १९६८ रोजीची घटना आठवली. ज्यात बबन ढाकणे या तरुणाने प्रेक्षक गॅलरीतून मागण्याची कागदे सभागृहात भिकरावली होती, नुकतेच अडीच महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे.
संसदेतील प्रेक्षक गॅलरीतून उडी मारलेल्या तरुणांच्या घटनेची देशभरात चर्चा सुरू आहे. काही मिनिटांतच या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो देशभरात पसरले असून याप्रकरणी कसून तपास सुरू आहे. तुर्तात हे विद्यार्थी असून बरोजगारी, शेतकरी आणि देशातील प्रश्नांसदर्भात त्यांनी बेकायदेशीर मार्गाने अशारितीने आवाज उठवल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या तरुणांच्या उडीमुळे महाराष्ट्र विधानसभेत ८ जुलै १९६८ रोजी एका तरुणाने मारलेल्या उडीची आठवण झाली. बबन ढाकणे असं या युवकांचं नाव होतं, जे पुढे जाऊन आमदार, खासदार आणि मंत्रीही बनले होते.
८ जुलै १९६८ रोजी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य असलेल्या बबन ढाकणे यांनी पाथर्डी तालुक्यातील वीजेच्या प्रश्नावरुन विधानसभेत गोंधळ घातला होता. विद्युतीकरणाच्या प्रश्नावर विधानसभा गॅलरीतून त्यांनी मागण्यांची पत्रके भिरकावून सभागृहात उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, तेथील मार्शलने त्यांना ताब्यात घेऊन कुलाबा पोलीस ठाण्यात नेले होते. ही राज्यभरात प्रचंड गाजली होती, वर्तमानपत्रांच्या पानावर बबनराव ढाकणेंचा फोटो आणि बातमी होती. त्यावेळी, कै. वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तर कै. बाळासाहेब भारदे हे विधानसभा अध्यक्ष होते. विशेेष म्हणजे तेही पाथर्डी तालुक्यातीलच होते.
बबनराव ढाकणेंच्या या कृत्यावर विधानसभेत हक्कभंगाचा ठरावही करण्यात आला. त्यांना सरकारने माफी मागण्यास सुचवले होते. परंतु जनतेसाठी आपण आंदोलन केले असे सांगत त्यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांना ७ दिवस कारावासाची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी स्वतः या प्रश्नावर बैठक बोलून दोन महिन्यात त्यांच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, त्याची पूर्तता करीत मुख्यमंत्री नाईक स्वत: वीजेच्या प्रश्नावरील कामाच्या उद्घाटनासाठी पाथर्डीत गेले होते.
पंचायत समिती सदस्य ते केंद्रीय मंत्री असा धडाडीचा प्रवास करणारे बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच दिल्ली गाठून तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांची भेट घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले होते. गोवा मुक्ती संग्रामातही ते सहभागी झाले होते. चार वेळा आमदार, एकदा खासदार, मंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, विधानसभेचे उपाध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द गाजली. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना, तत्पूर्वी राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेची स्थापना त्यांनी केली. खासदार म्हणून ते बीडमधून विजयी झाले होते. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. दरम्यान, अडीच महिन्यांपूर्वी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाले.
बबनराव ढाकणेंचे निधन
दरम्यान, बबनराव ढाकणे यांचे २७ ऑक्टोबर २०२३ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते न्यूमोनियाने आजारी होते. त्यामुळे त्यांना नगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.