नवी दिल्ली : भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने (एएआय) ६३ विमानतळांसाठी १९८ शारीरिक तपासणी यंत्रे (बॉडी स्कॅनर) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळाच्या प्रवेशाद्वारावर सध्या असलेल्या धातुशोधक आणि हाताने धातूंची आणि प्रवाशांची तपासणी करणाऱ्या यंत्रांच्या जागी ही नवीन यंत्रे बसविली जाणार आहेत.
कोविड-१९ साथ येण्याच्या आधीपासून ही शारीरिक तपासणी यंत्रे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मार्चपासून सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून हाताने तपासणी करण्याचे काम करण्यासाठी हे स्कॅनर्स मागविणे जरूरी झाले. या १९८ स्कॅनर्सपैकी चेन्नई विमानतळासाठी १७, कोलकातासाठी १७ आणि पुणे विमानतळासाठी १२ स्कॅनर खरेदी केले जाणार आहेत.
भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (एएआय) भारतातील शंभराहून अधिक विमानतळांचे व्यवस्थापन करते. अधिकाºयाने सांगितले की, सात स्कॅनर श्रीनगर विमानतळावर लावले जाणार आहे. विशाखापट्टण येथे ६, तिरुपती, बागडोगरा, भुवनेश्वर, गोवा आणि इम्फाळ विमातळावर प्रत्येकी पाच स्कॅनर लावले जातील. अमृतसर, वाराणसी, कालिकत, कोईम्बतूर, त्रिची, गया, औरंगाबाद आणि भोपाळ विमानतळावरही चार-चार स्कॅनर लावले जाणार आहेत. ६३ विमानतळांसाठी बॉडी स्कॅनर्स खरेदी करण्यासाठी निविदा जारी करण्यात आली असून, तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या. तांत्रिक मापदंडानुरूप या कंपन्याचे बॉडी स्कॅनर्स असल्यास या कंपन्यांना वित्तीय बोली लावण्यास सांगितले जाईल.
पिवळा ठिपका दिसल्यास फेरतपासणी
प्रवाशांना विमानतळावर शारीरिक तपासणी करण्याआधी जाकीट, बूट, बेल्ट आणि धातूच्या वस्तू काढाव्या लागतील. यंत्रावर पुतळ्यासारखी प्रतिमा दिसते. पटलावर (स्क्रीन) पिवळ्या रंगाचा ठिपका दिसल्यास शरीराच्या त्या भागाची पुन्हा तपासणी करणे जरूरी आहे, असा याचा अर्थ होतो. बॉडी स्कॅनर्स लावल्यानंतर हाताने तपासणीची गरज राहणार नाही.