नवी दिल्ली/भोपाळ: काँग्रेस नेते कमलनाथ थोड्याच वेळात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र याआधीच 34 वर्ष जुन्या प्रकरणामुळे कमलनाथ वादात सापडले आहेत. 1984 च्या शीखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचं नाव पुढे आलं होतं. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री न करण्याची मागणी भाजपानं केली आहे. ज्या दिवशी दंगल प्रकरणात काँग्रेसच्या एका नेत्याला जन्मठेप झाली, त्याच दिवशी याच दंगलीत नाव असलेल्या एका नेत्याला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जात आहे. काँग्रेसची ही कृती निषेधार्ह असल्याची टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयानं काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात दोषी ठरवलं. दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यानं कुमार यांना जन्मठेप सुनावण्यात आली. मात्र हत्या प्रकरणात कुमार यांची मुक्तता झाली आहे. याच प्रकरणात काँग्रेस नेते कमलनाथ यांचंही नाव पुढे आलं होतं. शीख समाज ज्या व्यक्तीला हत्याकांडात दोषी समजतो, त्याच व्यक्तीला काँग्रेसकडून मुख्यमंत्री केलं जातं आहे, ही शीख समाजाची मोठी थट्टा आहे, अशा शब्दांमध्ये जेटली यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. सज्जन कुमार शीख विरोधी दंगलीचा चेहरा होते आणि या हत्याकांडाचे डाग काँग्रेस आणि गांधी परिवारावर कायम असतील, असं जेटलींनी म्हटलं. शीख विरोधी दंगलीवरुन भाजपा नेते काँग्रेसवर तोफ डागत असताना दिग्विजय सिंह पक्षाच्या बचावासाठी पुढे आले. जेटली यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं ट्विट सिंह यांनी केलं आहे. 'या प्रकरणातील एफआयआरमध्ये किंवा आरोपपत्रात कमलनाथ यांचं नाव नाही. कोणत्याही न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू नाही. ते 1991 पासून केंद्रात मंत्री होते. तेव्हा भाजपाला आक्षेप नव्हता. मात्र आताच नेमकं काय झालं?,' असा सवाल दिग्विजय सिंह यांनी जेटली आणि भाजपा नेत्यांना विचारला आहे.