नवी दिल्ली - नोव्हेंबर 1984 मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल देत सज्जन कुमारला दोषी ठरवले. कुमारला शीखविरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहेत. याप्रकरणी शिक्षा भोगण्यासाठी सज्जन कुमारनं सोमवारी (31 डिसेंबर) कड़कड़डूमा कोर्टासमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याची मंडोली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, शीखविरोधी दंगलप्रकरणी दोषी ठरलेले महेंदर यादव, किशन खोखर यांनी कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. यादव आणि खोखर यांना प्रत्येकी 10-10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
17 डिसेंबर रोजी नवी दिल्ली हायकोर्टानं सज्जन कुमारला 1984 शीखविरोधी दंगल प्रकरणात दोषी ठरवले होते. शिवाय, सज्जन कुमारसह सर्व दोषींना 31 डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचेही आदेश दिले होते.
(1984 शीख विरोधी दंगल प्रकरण: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा)
दरम्यान, सज्जन कुमारनं आत्मसमर्पण करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज नवी दिल्ली हायकोर्टात केला होता. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी कोर्टाकडे आत्मसमर्पणाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती. पण कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला आणि 31 डिसेंबर रोजीच आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. 34 वर्षांपूर्वी झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमारला शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याआधी याच प्रकरणात त्यांची मुक्तता झाली होती. 1 नोव्हेंबर 1984 मध्ये दिल्लीच्या राज नगर भागात पाच शिखांची हत्या झाली होती.
या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं सज्जन कुमारची सुटका केली. या निकालाला सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं. दिल्लीच्या कँटॉनमेंटच्या अगदी समोर ही घटना घडली, त्यावेळी प्रशासन नेमकं काय करत होतं, असा प्रश्न सुनावणीवेळी न्यायालयानं विचारला होता.