भोपाळ : देशात 1984 मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे कमलनाथ यांच्या मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाला भाजपाकडून विरोध करण्यात आला. याप्रकरणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरच्यामाध्यमातून कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. मात्र, काही वेळानंतर ते खुद्द कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यानंतर दुसरे ट्विट करत त्यांनी कमलनाथ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
'कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता...' असे ट्विट करत शिवराज सिंह चौहान यांनी 1984 मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला शिवराज सिंह चौहान आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांनी म्हणून शपथ घेतली. यावेळी शपथविधी सोहळ्याला शिवराज सिंह चौहान यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.
दुसरीकडे, आज दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात दोषी ठरवले. दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्याने सज्जन कुमार यांना जन्मठेप सुनावण्यात आली. मात्र, हत्या प्रकरणात सज्जन कुमार यांची मुक्तता झाली आहे. याच प्रकरणात काँग्रेस नेते कमलनाथ यांचेही नाव पुढे आले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे.