नवी दिल्ली - 1984 साली दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित असलेल्या एका खटल्याप्रकरणी दोन दोषींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यापैकी यशपाल सिंह याला फाशी, तर नरेश सहरावत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शीखविरोधी दंगली प्रकरणी गेल्या 34 वर्षांमध्ये न्यायालयाने सुनावलेली ही पहिली फाशीची शिक्षा आहे. सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने गेल्या आठवड्यात या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. आरोपींच्या शिक्षेबाबत युक्तिवाद होत असताना पीडितांच्या वकिलांनी दोषींना फाशी देण्याची मागणी केली होती. तर बचाव पक्षाने आरोपींना कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली होती.
केंद्र सरकारच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलॆल्या एसआयटीने गेल्या आठवड्यामध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांच्यासमोर शिक्षेबाबत झालेल्या चर्चेवेळी आरोपींचा गुन्हा गंभीर असून, दोषींना त्यांनी कारस्थान रचून हा अपराध घडवून आणल्याचा दावा करत आरोपींना फाशी देण्याची मागणी केली होती.