नवी दिल्ली - सर्वात पहिल्यांदा ईमेल कधी वापरलं होतं? सर्वात पहिला ईमेलचा वापर कोणी केला होता? सध्या हे प्रश्न सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात विचारले जात आहे. प्रत्येकाला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, 1987-88 च्या दरम्यान मी डिजिटल कॅमेरामध्ये पहिल्यांदा फोटो काढला. पंतप्रधान मोदींच्या या दाव्यावर सोशल मिडीयात लोक हैराण झालेत. प्रत्येक जण या दाव्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे.
फक्त नेटीझन्स नव्हे तर राजकीय पक्षदेखील या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. काँग्रेसच्या आयटी विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. दिव्या यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, कोणी अंदाज लावू शकतं का की 1988 मध्ये मोदी यांचा ईमेल आयडी काय असेल? मला वाटतं dud@lol.com हा त्यांचा ईमेल आयडी असू शकेल. मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय सांगितले?
एका खाजगी वृत्तवाहिनीत मुलाखत देताना मोदींनी सांगितले की, मी पहिल्यांदा 1987-88 मध्ये डिजिटल कॅमेराचा वापर केला त्यावेळी खूप कमी लोकांकडे ईमेल आयडी उपलब्ध होते. माझ्या येथे विरमगाम तहसील येथे अडवाणी यांची रॅली होती. तेव्हा डिजिटल कॅमेराने मी त्यांचा फोटो काढला अन् तो फोटो दिल्लीला ट्रान्समिट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल होत आहे.
सोशल मिडीयात नेटीझन्स या व्हिडीओवर मोठ्य़ा प्रमाणात चर्चा करतायेत. अर्थतज्ज्ञ रुपा सुब्रमण्या यांनी लिहिलं आहे की, 1988 मध्ये पाश्चिमात्य देशांच्या काही वैज्ञानिकांकडे ईमेल असायचा. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात ईमेलचा वापर केला. मात्र 1995 नंतर उर्वरित देशांकडे ईमेलचा वापर सुरु झाला.
AIMIM चे प्रमुख असरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधानांकडे 1988 मध्ये पाकिट नव्हतं. मात्र ईमेल आणि डिजिटल कॅमेरा होता अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
व्हायरल व्हिडीओ शेअर करत शाहीद अख्तर यांनी लिहिलं आहे की, पहिल्यांदा डिजिटल कॅमेऱ्याची विक्री 1990 मध्ये झाल्याचं समोर आलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1988 मध्ये याचा वापर करावा तसेच इंटरनेटचा वापर केला. पण भारतात 14 ऑगस्ट 1995 इंटरनेट वापरण्यास सुरुवात झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालकोट स्ट्राईकच्या दिवशी असणाऱ्या हवामानावर भाष्य केलं. त्या विधानावरही नेटीझन्सकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची सोशल मिडीयात खिल्ली उडवली जात आहे.