नवी दिल्ली : भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांचे वीरमगाममधील सभेचे छायाचित्र मी डिजिटल कॅमे-याने काढले आणि लगेच ते ई-मेल केले. ते रंगीत छायाचित्र दुस-याच दिवशी दिल्लीच्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्याने अडवाणी यांनाही आश्चर्य वाटले होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केल्याने त्यांच्यावर सोशल मीडियामध्ये टीका सुरू झाली आहे.
ही टीका होण्याचे कारण म्हणजे १९८८ साली भारतात डिजिटल कॅमेरा उपलब्ध नव्हता. एवढेच नव्हे, तर त्यावेळी भारतात ई-मेलचीही सोय नव्हती. त्यामुळे मोदी यांच्या दाव्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. अनेकांनी सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदी यांच्या वरील दाव्यावर टीका करताना भारतात इंटरनेट १४ आॅगस्ट १९९५ रोजी सुरू झाल्याचे पुरावेच दिले आहे. विदेश संचार निगमतर्फे १५ आॅगस्ट रोजी ही सोय झाल्याचे अनेकांनी दाखवून दिले आहे.
भारतात फार लोकांकडे त्यावेळी डिजिटल कॅमेरा नव्हता. माझ्याकडे तो होता. त्यावेळी त्याचा आकारही खूप मोठा असायचा, असेही मोदी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सांगितले. पण त्या काळात भारतात डिजिटल कॅमेरा आला नव्हता, असेही अनेकांनी दाखवून दिले आहे. डिजिटल कॅमेरा व ई-मेल या दोन्हींचा पंतप्रधानांनी केलेला उल्लेख फसवा असल्याचे नेटिझन्सनी म्हटलेआहे.
अर्थतज्ज्ञ रूपा सुब्रमण्या यांनी म्हटले आहे की, १९८८ साली पाश्चात्य देशांतील केवळ काही वैज्ञानिकांकडेच ई-मेल असायचा. पण भारतात तो येण्याआधी १९८८ सालीच मोदी यांनी त्याचा वापर केल्याचे दिसते! शाहीद अख्तर यांनी लिहिले आहे की भारतात डिजिटल कॅमे-याची विक्रीच १९९0 साली सुरू झाली. ई-मेलही १९९५ साली आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी १९९८ साली पहिला ई-मेल पाठवल्याचा उल्लेखही एकाने केला आहे, तर ई-मेलद्वारे जे पहिले रंगीत छायाचित्र १९९२ साली पाठवण्यात आले, तेही सोशल मीडियावर टाकले आहे. काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनीही मोदी यांची खिल्ली उडवली आहे. एमआएमचे नेते असउद्दिन ओवेसी म्हणाले की, मोदी यांच्याकडे पैशांचे पाकिट नव्हते. पण महागडा कॅमेरा मात्र १९८८ साली होता!
ढगाळ हवामानाचा एअर स्ट्राइकला फायदामोदी मुलाखतीत म्हणाले की, 'बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळी अचानक हवामान बिघडले. त्यामुळे हवाई दलाचे वैमानिक पाकिस्तानच्या हद्दीत शिरू शकतील का, याविषयी साशंकता होती. माझ्या डोक्यात दोन विषय होते, एक म्हणजे गुप्ततेचा आणि दुसरा म्हणजे आपण काही फार मोठे वैज्ञानिक नसल्याचा.मात्र मी विचार केला की, आभाळ फारच भरून आले असेल आणि पाऊस असेल तर आपली विमाने पाकिस्तानच्या रडारमध्ये दिसणार नाहीत. या आभाळाचा आपल्याला लाभ होईल. सगळेच द्विधा मनस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आले आहे, चला पुढे जाऊ या. त्यांच्या या विधानाचीही खिल्ली उडवली जात आहे. हवामानशास्त्राचे शिक्षण मोदी यांनी घेतले कुठे, असा सवाल अनेकांनी विचारला आहे.