तिरुपती :
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानाकडे २.५ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये १० टनांहून अधिक सोने व १५९०० कोटी रुपयांच्या रकमेचाही समावेश आहे. तिरुपती येथे असलेल्या श्रीवेंकटेश्वराचे जगभरात कोट्यवधी भाविक आहेत. त्यांच्याकडून येणाऱ्या देणग्या तसेच दान केले जाणारे सोन्याचांदीचे, हिऱ्यांचे दागदागिने व अन्य जडजवाहिर यामुळे इतकी संपत्ती या देवस्थानाकडे जमा झाली आहे. २०१९ साली तिरुपती देवळाकडे १३,०२५ कोटी रुपयांच्या मुदतठेवी व ७.३ टन सोने होते. आता तीन वर्षांनी त्यात मोठी वाढ झाली आहे. या देवस्थानने त्याच्याकडील एकूण संपत्तीची माहिती रविवारी जाहीर केली.
सोन्याचा हिशेब नेमका असा...तिरुपती देवस्थानने त्याच्याकडे असलेल्या १०.२५ टन सोन्यापैकी ९.८ टन सोने स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (एसबीआय) तर बाकीचे सोने इंडियन ओव्हरसीज बँकेत ठेवले आहे. या देवस्थानकडून महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा, हरयाणा, आंध्र प्रदेश येथील अनेक मंदिरांची देखभाल केली जाते.
अशी आहे तिरुपती देवस्थानाकडील संपत्ती१५,९३८ कोटी रुपये रकमेच्या मुदतठेवी खाजगी, सरकारी बँकांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.१०.२५ टन सोने बँकेत ठेवले आहे.३,१०० कोटी रुपये इतके वार्षिक बजेट तिरुपती देवस्थानने २०२२-२३ या कालावधीसाठी सादर केले. ६६८ कोटी रुपये मुदतठेवींवरील व्याजाच्या रूपाने मिळतात.१,००० कोटी रुपये मिळतात भाविकांनी दानपेटीत अर्पण केलेल्या रोख रकमेतून७,००० एकर जमीन देवस्थानच्या मालकीची असून ९०० स्थावर मालमत्ता तिरुपती देवस्थानच्या मालकीच्या आहेत.